Beyond Sci-Fi: Stories of Ingenuity, Isolation, and the Human Spirit by Andy Weir

 

The Martian सिनेमा बघून बरीच वर्ष झाली होती पण लेखक Andy Weir लिखित त्याच नावाचं पुस्तक वाचण्याचा योग आला नव्हता.  पण त्याच लेखकाच्या Project Hail Mary या पुस्तकावर देखील सिनेमा येतो आहे हे कळल्यावर तातडीने ते पुस्तक वाचायला घेतलं आणि या लेखकाची पुस्तकं वाचायला आपण बराच उशीर केला असं वाटलं. 

Project Hail Mary हे  पुस्तक एका शिक्षकावर बेतलेले आहे. एक हायस्कुल मधील विज्ञानाचा शिक्षक एके दिवशी अंतराळयानात एका अनोळखी तारामंडळात असताना जागा होतो. आपण कोण? इथे कुठून आलो हे देखील त्याला आठवत नसते. त्याला त्याचे सहप्रवासी मृतावस्थेत आढळतात. Ryland Grace असं नाव असणाऱ्या शिक्षकाला नासाने एका खास मिशनवर पाठवलेले असते. कट टू- सूर्याचे तेज दिवसेंदिवस घटत चालले आहे आणि येत्या 9-10 वर्षात ते मोठ्या प्रमाणात कमी होऊन त्याचा परिणाम पृथ्वीवरील जीवन नष्ट होण्यात होऊ शकतो असे नासाच्या शास्त्रज्ञांच्या लक्षात येते. परंतु दुसऱ्या तारामंडळातील एका ग्रहावर त्याचा विशेष परिणाम होत नाहीये हे शास्त्रज्ञांच्या लक्षात येते. त्या ग्रहावर नक्की कशामुळे परिणाम होत नाहीये हे शोधण्यासाठी नासाची टीम एक आंतरराष्ट्रीय मिशन आखते. तत्पूर्वी विज्ञानाच्या शिक्षक असलेल्या परंतु गतकाळात शास्त्रज्ञ म्हणून काम केलेल्या Ryland च्या अंगावर हे सर्व काय गौडबंगाल आहे व सूर्याचे तेज नक्की कोणत्या घटकामुळे कमी होत आहे हे शोधण्याची जबाबदारी पडते. लॅबमध्ये काम करणाऱ्या एका शिक्षकावर अंतराळात जाण्याची जबाबदारी का पडते आणि त्यातून त्याला काय काय शोध लागत जातात हे अप्रतिमरीत्या लेखक आपल्यापुढे मांडत जातो. कथेला एका टप्प्यावर अनपेक्षित कलाटणी मिळते आणि हे संपूर्ण मिशन एका वेगळ्याच वाटेवर जाते.

Project Hail Mary वाचल्यावर लगोलग The Martian देखील वाचून टाकलं. त्याची कथा थोडक्यात अशी - सहा दिवसांपूर्वी नासाचे सहा शास्त्रज्ञ एका मिशन अंतर्गत मंगळ ग्रहावर उतरतात. पण अचानक उदभवलेल्या एका वादळामुळे त्यांना मिशन अबोर्ट करून तातडीने निघावं लागतं पण निघताना त्यांचा एक शास्त्रज्ञ Mark Watney त्या वादळात हरवतो. खूप प्रयत्न करून देखील टीमला त्याचा सुगावा लागत नाही, त्यामुळे मार्कचा शोध थांबवून टीमची कमांडर Lewis अतिशय खिन्नतेने मंगळ ग्रह सोडण्याचा निर्णय घेते. कट टू- पृथ्वीवर मार्कच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरलेली असताना एक दिवस नासाच्या SatCom येथे काम करणाऱ्या Mindy Park या सॅटेलाईट कम्युनिकेशन इंजिनीयरला मंगळ ग्रहाच्या त्याच ठिकाणी काही हालचाल होत असलेली सॅटेलाईट फोटोद्वारे समजते. आणि संपूर्ण जगाला समजते की Mark Watney हा मंगळावर अजूनही जिवंत राहिलेला किंवा कदाचित मंगळावर मृत्यू होऊ घातलेला पहिला माणूस ठरणार आहे. मग खेळ सुरू होतो तो Mark Watney या शास्त्रज्ञाला वाचवण्याचा. Mark ची अतिशय उत्कंठावर्धक कथा आपल्यासमोर उलघडत जाते.

 व्यवसायाने Software Engineer असणाऱ्या Andy Weir याने The Martian चित्रपटाच्या यशानंतर पूर्णवेळ लेखक म्हणून काम करायला सुरुवात केली. Andy Weir च्या लेखनात अंतराळयान, ग्रह, जीवशास्त्र,  गणित, भौतिकशास्त्र, संगणक प्रणाली इत्यादींचे तांत्रिक तपशील बऱ्यापैकी अचूक आणि सखोल दिलेले असतात. हे वाचताना आपल्याला कल्पित कथा वाचतोय असं वाटत नाही, तर प्रत्यक्षात ते घडू शकेल असा अनुभव येतो. पण म्हणजे यामागे त्याचा खोल अभ्यास किंवा भौतिकशास्त्र, गणित या विषयात त्याने खूप अभ्यास केला असंही नाही. एका मुलाखती दरम्यान Andy  Weir ने खुलासा केला की, अगदी एरोस्पेस क्षेत्रातील तज्ञांशी संपर्क साधल्यानंतरही, त्याला अनेकदा संशोधनासाठी Google वापरणं अधिक जलद वाटतं, कारण अनेक इंजिनिअर आणि शास्त्रज्ञ त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष नियमितपणे ऑनलाईन शेअर करतात. सहज उपलब्ध असणाऱ्या माहितीतून इतक्या खोलवर साय-फाय कादंबरी लिहिल्याबद्दल लेखकाला नक्कीच दाद द्यायला हवी. ज्याप्रमाणे जीवशास्त्र,  गणित, भौतिकशास्त्र या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये येतं त्याप्रमाणेच दोन्ही कादंबऱ्यांमध्ये Humanity हा एक महत्त्वाचा आणि खोलवर विचार केला गेलेला विषय आहे. Martian मध्ये केवळ एक माणूस परक्या ग्रहावर एकटा पडला असला तरी वेळ, पैसा, श्रम कशाचीही पर्वा न करता अहोरात्र झटणारे NASA  आणि इतर संस्था असो किंवा Project Hail Mary मध्ये पृथीवरील मानवजात टिकवण्यासाठी Ryland  ने केलेली धडपड असो, साय-फाय कादंबरी असली तरी हे मानवी मूल्य अधिकपणे ठळक होत जातात. दोन्ही कादंबऱ्या या काहीशा सिरीयस सिच्युएशन मधून घडत असल्या तरी मुख्य पात्रांच्या तोंडी असलेले संवाद धमाल आहेत. Project The Hail Mary मध्ये Ryland च्या तोंडी एक संवाद आहे की "Human beings have a remarkable ability to accept the abnormal and make it normal." मला व्यक्तिशः Project The Hail Mary हे पुस्तक सर्वात जास्त आवडलं आणि अधिक प्रभावी लेखन वाटलं. Project The Hail Mary सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालेला आहे. सिनेमा यायच्या आधी हे पुस्तक नक्की वाचा आणि तुम्हाला कोणतं आवडतंय ते सांगा.  

Comments

Popular posts from this blog

The Visitor: A Suspense Story You Can’t Put Down

दुर्दम्य..असामान्य लोकमान्य