मराठीतील नवी कादंबरी : टार्गेट असद शाह


जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाच्या पंतप्रधानाविरुद्ध पाकिस्तानी दहशतवादी आणि चायना यांच्याकडून एक घातपाताचा कट शिजतो. त्यासाठी संपूर्ण संरक्षण यंत्रणा वेठीस धरली जाते पण तो कट सफल होतो की नाही? त्यात फक्त बाहेरच्या देशातले सामील असतात की भारतातले देखील? यासाठी कादंबरी वाचणं इष्ट होईल. 
     ज्येष्ठ लेखक वसंत वसंत लिमये लिखित 'टार्गेट असद शाह' या कादंबरीची ही थोडक्यात रूपरेषा. कादंबरीचं शीर्षक वाचल्यापासूनच उत्कंठा निर्माण होते. जंगलाचा राजा असलेल्या सिंहाला अरबी भाषेत असद शाह म्हणतात याचा उलगडा लेखकाने पुस्तकाच्या सुरुवातीलाच केलेला आहे. या कादंबरीचं कथानक अतिशय वेगवान आहे. कादंबरी काहीशी नॉन लिनीअर पद्धतीने उलगडत जाते आणि वेळोवेळी स्थळ काळाचे उल्लेख आपल्यासमोर मांडत जाते. कादंबरीमध्ये भूगोल हा देखील महत्वाचा घटक आहे, आणि लेखकाने त्याचा अनुभव आणि अभ्यास येथे पुरेपूर वापरलेला दिसतो. कादंबरीच्या शेवटी दिलेली भौगोलिक स्थळांची यादी वाचून थक्क व्हायला होतं. कादंबरीत उल्लेखलेल्या जवळजवळ सर्व स्थळांना लेखकाने स्वतः भेट दिलेली आहे. कादंबरीतले महत्वाचे प्रसंग जिथे घडतात त्या त्या स्थळांचे तपशीलवार नकाशे लेखकाने पुस्तकात दिले आहेत.
   कादंबरीत असलेली पात्र ही वास्तवाच्या भरपूर जवळ जाणारी आहेत आणि आपण सहजरित्या ती रिलेट करू शकतो. कादंबरीतली मुख्य पात्र कर्नल गॅम्बो, आयटी तंत्रज्ञ कबीर आणि कटाचा सूत्रधार अरबाज ही आहेत. कथानक पूर्ण या तिघांभोवती फिरतं. पात्रांचा हुद्दा आणि त्यांचे संवाद यांचा काहीसा मेळ बसत नाही, संवादांवर अजून काम व्हायला हवे असे वाटते. ही एक बाब सोडली तर कथानक उत्तम आहे, आवडले. कादंबरीत येणारे अनेक प्रसंग, व्यक्तींचे उल्लेख हे वास्तवातल्या प्रसंग आणि व्यक्तींशी मिळतेजुळते आहेत. डाव्या विचारसरणीला आणि राष्ट्रीय एकात्मतेला धक्का पोहोचवणाऱ्या वृत्तींना लेखकाने झोडपून काढले आहे. 
  ही कादंबरी लेखक वसंत वसंत लिमये यांच्या इतर कादंबरी प्रमाणेच अत्यंत खोलात जाऊन प्रसंग उलगडते. या कादंबरीचा विषय कसा सुचला याबाबत लिमये म्हणतात - आयआयटीत असताना Frederiack Forsyth यांची ‘Day of the Jackal’ ही कादंबरी वाचली होती आणि लगेचच त्यावरील झपाटून टाकणारा सिनेमादेखील पाहिला होता. नव्या कादंबरीचा विषय यावरून सुचला आणि त्यासाठी Frederiack Forsyth यांचा मी ऋणी आहे.
  मराठीतल्या नवीन कादंबऱ्यांमध्ये 'टार्गेट असद शाह' ही एक आश्वासक कादंबरी म्हणता येईल. कादंबरीची निर्मितीमुल्य उत्तम आहे आणि मुखपृष्ठ तर लाजवाब आहे ! संवादांवर थोडी अजून मेहनत घेऊन पुढील आवृत्तीत सुधारणा केल्यास ही मराठीतील बेस्ट सेलर कादंबरी होऊ शकेल. पण तरी आत्ता जी आहे ती देखील चांगली आहेच त्यामुळे नक्की वाचा एक वेगळा अनुभव ही कादंबरी नक्कीच देईल. 

- ओंकार जोशी

पुस्तकाचे नाव : टार्गेट असद शाह
लेखक : वसंत वसंत लिमये
प्रकाशक : इंद्रायणी प्रकाशन
पृष्ठसंख्या : ४०६
किंमत : ₹ ४५०/-

Comments

  1. ओंकार, थोडक्यात पण नेमकेपणाने पुस्तकाचं मर्म उलगडून दाखवलंय. असंच लेखन सातत्याने घडू देत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दुर्दम्य..असामान्य लोकमान्य

You don't mess with the special investigators