You don't mess with the special investigators
ब्लॉगच्या शीर्षकावरून अनेकांच्या लक्षात आलंच असेल की हा ब्लॉग कशाविषयी आणि कोणाविषयी आहे. ब्रिटिश लेखक जेम्स ग्रँट ज्याला आपण त्याच्या 'पेन नेम' ली चाईल्ड या नावाने ओळखतो त्याच्या जॅक रिचर सिरीजचे अनेक चाहते जगभरात आहेत. १९९७ साली ली चाईल्डने या पुस्तक मालिकेला प्रारंभ केला आणि आत्तापर्यंत तब्बल २७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि २८ वं पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. याच मालिकेतील ११ व्या म्हणजेच बॅड लक अँड ट्रबल या पुस्तकाविषयी आपण थोडक्यात माहिती करून घेऊ.
कादंबरीची सुरुवात होते कॅलिफोर्नियातील एका वाळवंटातील घडामोडीने. एका माणसाचे दोन्ही पाय मोडून त्याला हेलिकॉप्टर मधून 3000 फुटावरून खाली फेकण्यात येते, त्यानंतर १७ दिवसांनी जॅक रिचर आपल्या अंगावरचे कपडे आणि एक ATM कार्ड एवढंच स्वतःजवळ बाळगून कॅलिफोर्नियात इतस्ततः भटकत असताना एका ATM मशिनमधून पैसे काढण्यासाठी जातो तेव्हा त्याला समजतं की त्याच्या खात्यात कोणा अनामिक व्यक्तीने $१०३०.०० इतकी रक्कम जमा केली आहे. या अनामिक व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तो बँकेच्या कस्टमर केअरला फोन करतो तेव्हा बँकेची कर्मचारी रिचरला त्या अनामिक व्यक्तीचं नाव सांगायला नकार देते कारण हे बँकेच्या तत्वाचं उल्लंघन ठरेल अशी तिला भीती वाटते. त्या क्षणी रिचरच्या डोक्यात वीज पेटते आणि तो फक्त त्या बँक कर्मचारीला विचारतो की ही व्यक्ती फ्रान्सिस निगली आहे का? ती बँक कर्मचारी क्षणार्धात या नावाला दुजोरा देते. फ्रान्सिस निगली ही रिचरची जुनी साथीदार, मिलिटरी मधून बाहेर पडल्यावर रिचर आणि त्याच्या साथीदारांनी मिळून स्पेशल इन्वेस्टीगेटर्स ची टीम तयार केली. You don't mess with special investigators हे ब्रीदवाक्य अनुसरूनच ही टीम एखाद प्रोजेक्ट पार पाडत असे. ही ८ जणांची टीम सेपरेट झाल्यापासून अनेक दिवस एकमेकांच्या संपर्कात नसते. १०३० हा त्यांचा जुना आर्मी कोड, ज्याचा अर्थ 'तात्काळ मदत हवी आहे !' खात्यात जमा झालेल्या रकमेवरून हा कोड रिचरला समजेल हे डोकं फक्त निगलीकडेच आहे हे ओळखून रिचर कामाला लागतो. पुढे तो काय करतो? निगली आणि इतर साथीदार त्याला भेटतात का? हेलिकॉप्टर मधून खाली वाळवंटात फेकला गेलेला माणूस कोण असतो? त्याला कोण खाली फेकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी बॅड लक अँड ट्रबल ही कादंबरीच वाचायला हवी.
ली चाईल्डने या पुस्तकाच्या कथानिर्मितीची सुरुवात २००५ साली केली जेव्हा त्याला नोकरीतून काढून टाकलेल्या घटनेला १० वर्ष पूर्ण झाली होती. जेम्स ग्रँट उर्फ ली चाईल्ड हा Granada Television मध्ये नोकरीला असताना त्याने हजारो जाहिरात आणि कथानके लिहिली. पुढे कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंगमुळे त्याचा जॉब गेला आणि त्याने कादंबरी लेखनाकडे आपला मोर्चा वळवला. बॅड लक अँड ट्रबल ही कादंबरी लिहिताना आपले जुने सहकारी, मित्र या सर्वांबरोबर व्यतीत केलेला काळ लेखकाच्या नजरेसमोरून गेला आणि ते मित्र, सहकारी आता काय करत असतील या विचाराने ली चाईल्ड कासावीस झाला आणि त्याने आपलं हे पुस्तक मित्रांच्या, सहकाऱ्यांच्या रियुनियन विषयी लिहायचं असा चंग बांधला. त्यामुळे या पुस्तकात आपल्याला जॅक रिचर आणि त्याच्या सहकाऱ्यांविषयी त्यांच्या फॅमिली विषयी बरेच ह्रदय प्रसंग वाचायला मिळतात. ली चाईल्ड म्हणतो की "रिचरच्या नियमित वाचकांना माहिती आहे की रिचर हा किती आत्मविश्वासपूर्ण निर्णय घेणारा आहे पण या पुस्तकात मी मुद्दामच त्याला त्याचे निर्णय त्याच्या इतर सहकाऱ्यांच्या निर्णयांशी तुलना करून घ्यायला लावले कारण असं केल्याने रिचरला इतरांच्या तुलनेत स्वतःचं मूल्यमापन करता येईल". हा खूप महत्त्वाचा बदल इतर रिचर पुस्तकांच्या तुलनेत या पुस्तकात जाणवतो त्यामुळे हे पुस्तक काहीसं संथ वाटू शकते पण त्यामागचा विचारसुद्धा लक्षात घ्यायला हवा.
हे पुस्तक अशा काळात रचलं गेलं आहे ज्या काळात नुकताच ९/११ चा हल्ला अमेरिकेत होऊन गेलाय, त्यामुळे सिक्युरिटीची परिमाणं बदलली आहेत. बँक सिस्टीम बदलत आहे, टेक्नॉलॉजीचं युग अवतरत आहे. अशा या काळात रिचरजवळ देखील बँकेचं ATM कार्ड आलं आहे. ATM चा उल्लेख करताना रिचरचं अंकगणिताशी असलेलं नातं या पुस्तकात लेखकाने अधोरेखित केलं आहे. उदाहरणार्थ, रिचरच्या ATM चा पिन असतो ८१९७ हा पिन रिचर निवडतो कारण ९७ ही दोन अंकी सर्वोच्च मूळ संख्या आहे आणि ८१ हा ज्याचे वर्गमूळ आहे तो अंक ८१ या संख्येची बेरीज केल्यानंतर मिळतो (८+१=९). संख्यांशी आणि अंकांशी निगडित अशा अनेक गमतीजमती या पुस्तकात वाचायला मिळतील.
Amazon Prime ने ली चाईल्डच्या जॅक रिचर वर सिरीज बनवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पहिला सिझन किलिंग फ्लोअर या पुस्तकावर आधारित रिलीजही झाला. पहिल्या सिझनच्या उत्तुंग यशामुळे Amazon आता दुसरा सिझन घेऊन येत आहे आणि हा दुसरा सिझन बॅड लक अँड ट्रबल या पुस्तकावर आधारित असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे पुस्तक वाचा जेणेकरून दुसऱ्या सिझनचा आनंद द्विगुणित होईल. ही रिचरकडून मिळालेली सक्त ताकीदच आहे असं समजा ज्याची दखल तुम्ही गंभीरपणे घ्याल कारण You don't mess with the special investigators !
मस्त उत्कंठावर्धक लिहिलय
ReplyDeleteधन्यवाद अजिंक्य 🙏
Deleteमस्त लिहिलंय! Bad luck and trouble हा साधारण काय ऐवज आहे याची पुरेपूर कल्पना उत्कंठा कायम ठेवून दिली आहे. सूर सापडतंय छान, keep it up!
ReplyDeleteखूप खूप आभार रवि सर 🙏
Delete