The Visitor: A Suspense Story You Can’t Put Down
The Visitor (किंवा Running Blind) हे ली चाईल्डच्या रिचर सिरीज मधील हे चौथं पुस्तक. जॅक रिचर हा भूतपूर्व मिलिटरी पोलिस अधिकारी, अत्यंत बुद्धिमान, थोडक्यात बोलणारा, पण घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणारा, कोणत्याही ठिकाणी जास्त काळ न थांबणारा, आणि जगण्याच्या पद्धतीविषयी स्वतःचं एक वेगळं तत्त्वज्ञान असणारा असा एक विलक्षण अवलिया. परंतु या पुस्तकात रिचर आपल्या नेहमीच्या भटक्या जीवनशैलीपासून थोडा विराम घेतो आणि त्याच्या गर्लफ्रेंड सोबत तिच्या वडिलांनी रिचरच्या नावावर केलेल्या एका बंगल्यात राहतो.
कथेची सुरुवात अमेरिकेतील विविध ठिकाणी घडणाऱ्या एका अनोख्या आणि विचित्र खून मालिकेपासून होते. एका ठराविक कालावधीनंतर, एकामागून एक भूतपूर्व मिलिटरीतील स्त्रिया त्यांच्या स्वतःच्या बाथरूममध्ये मृत अवस्थेत आढळतात. प्रत्येक मृतदेहाच्या आजूबाजूचा देखावा जवळजवळ एकसारखा असतो. बाथटबमध्ये मिलिटरीमध्ये वापरला जाणारा गडद हिरवा रंग काठोकाठ भरलेला, टबमध्ये शांतपणे पडलेला मृतदेह, कोणतीही जखम नाही, रक्त नाही, आणि संघर्षाचे कोणतेही चिन्ह नाही. फॉरेन्सिक तपासानंतरही मृत्यूचं नेमकं कारण समजत नाही. खूनाच्या तपासात FBI सहभागी होते. तपासादरम्यान ते खुन्याचा प्रोफाईल तयार करतात – उंच, सशक्त, लष्करी पार्श्वभूमी असलेला, शिस्तप्रिय, आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असा व्यक्ती. हा प्रोफाईल वाचून FBI च्या टीमला जाणवतं की तो जवळजवळ रिचरशी जुळतो. त्यानंतर FBI रिचरवर पाळत ठेवते आणि एका क्षणी त्याला थेट अटक करते. इथूनच खऱ्या अर्थाने पुस्तकातील थ्रिल सुरू होतो. रिचरला या गुन्ह्याशी स्वतःचं नाव जोडलेलं नको आहे, त्यामुळे तो FBI च्या तपासात सहभागी होतो. पण त्याचवेळी, तो तपासकर्त्यांइतकाच उत्सुक आहे की हा खून करणारा कोण आणि तो हे कसं करतो. कारण एकही पुरावा मागे न ठेवता खून करणं हे एका निष्णात खुन्याचं लक्षण आहे आणि त्यामुळेच रिचरसाठी सुद्धा हि केस एक चॅलेंज ठरते.
कथानकाच्या पार्श्वभूमीवर लेखकाने काही गंभीर आणि वास्तववादी मुद्द्यांना हात घातला आहे. FBI आणि मिलिटरी यांच्यातील न संपणारं शीतयुद्ध हे त्यातलं एक महत्त्वाचं अंग आहे. दोन्ही संस्थांचा उद्देश राष्ट्रीय सुरक्षा हा एकच असला तरी त्यांच्या काम करण्याच्या पद्धती, संसाधनांवरील हक्क, आणि अंतर्गत राजकारण यामुळे तणाव निर्माण होतो. याशिवाय, मिलिटरीमधील शस्त्रचोरी आणि गुप्त माहितीचा गैरवापर यांसारखे विषय कथेतून डोकावतात. हे सर्व केवळ थ्रिलरची पातळी वाढवत नाही, तर कथेला वास्तवाशी जोडून ठेवतं.
चाईल्डच्या लिखाणाची पद्धत खूप विस्तृत आहे. ली चाईल्डचा तपशीलवार वर्णन करण्याचा हातखंडा इथे स्पष्ट दिसतो. तो केवळ संवादावर भर देत नाही, तर प्रत्येक प्रसंगाची जागा, हवामान, पात्रांची देहबोली, आणि आजूबाजूचा वातावरण इतक्या नेमकेपणाने रंगवतो की वाचकाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्याचा भास होतो. कधी कधी ही तपशीलवार शैली थोडी लांबट वाटू शकते, विशेषतः जेव्हा आपण पटकन पुढच्या घटनांवर जाऊ इच्छितो. पण या पद्धतीमुळे वाचकाची कथानकाशी नाळ घट्ट जोडली जाते.
प्रत्येक भागात लपलेल्या सूक्ष्म संकेतांमुळे वाचक कथानकात गुंतत जातो, तर काही टप्प्यांवर कादंबरी अनपेक्षित वळण घेते आणि वाचकाला पुन्हा नव्या थराराच्या उंबरठ्यावर आणून उभं करते. काही वेळा लांबचलांब वर्णनामुळे कथानकाची गती किंचित मंदावते, पण त्या बदल्यात वातावरणनिर्मिती मात्र अप्रतिम होते. शेवटापर्यंत ताण कायम ठेवत ही कादंबरी वाचकाला एका समाधानकारक आणि संस्मरणीय अनुभवाकडे नेते. एकंदरीत The Visitor ही कादंबरी रिचर मालिकेमधली एक लक्षणीय कादंबरी म्हणावी लागेल.
Comments
Post a Comment