दुर्दम्य..असामान्य लोकमान्य


पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. ब्रिटिश अधिकारी रँडच्या आदेशानुसार सोजिरे पुणेकरांवर अनन्वित अत्याचार करीत होते. या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी पुण्यात २२ जून १८९७ रोजी चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला. या हत्येमागे बळवंतरावांचा हात असल्याच्या संशयावरून इंग्रजांनी टिळकांना अटक केली आणि १८ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. अखेर कोणत्याही सत्काराच्या समारंभात भाग घ्यायचा नाही या अटीवर बळवंतरावांची सुटका झाली. तुरुंगातून बाहेर पडल्यावर बळवंतराव त्यांचे गुरू अण्णासाहेब पटवर्धनांच्या घरी गेले आणि त्यांना नमस्कार केला. अण्णासाहेबांनी त्यांना घट्ट मिठीच मारली. बळवंतरावांच्या देहाची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, "आता पुढे काय विचार आहे?" तेव्हा बळवंतरावांच्या काळ्या ठिक्कर पडलेल्या ओठातून क्षीण पण ठाम आवाजात शब्द उमटले, "पुनःश्च हरि ओम !"

        गंगाधर गाडगीळ लिखित "दुर्दम्य" या कादंबरीच्या बाबतीत अशीच काहीशी हकीकत माझ्या बाबतीत घडली. मागच्या वर्षी ही कादंबरी वाचायला घेतली होती पण काही कारणाने ती अर्धवटच सोडावी लागली. मग यावर्षी अगदी ठरवून या कादंबरीचा 'पुनःश्च हरि ओम' केला आणि अक्षरशः झपाटल्यासारखी ही कादंबरी वाचून पूर्ण केली. लोकमान्यांच्या जीवनावरची ही अत्यंत विस्तृत अशी कादंबरी आहे. बाळ गंगाधर टिळक ते लोकमान्य टिळक पर्यंतचा अत्यंत उत्कंठावर्धक प्रवास या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळतो.
  कादंबरीची सुरुवात होते ती बळवंतरावांच्या शालेय शिक्षण संपून महाविद्यालयीन शिक्षणाच्या सुरुवातीने. गणित हा बळवंतरावांचा अतिशय आवडीचा विषय. एखाद्या अवघड गणितात किंवा प्रमेयात त्यांची तासंतास समाधी लागत असे आणि ते गणित सुटले की त्यांच्या आनंदाला परिसीमा उरत नसे. अंगापिंडाने बळवंतराव अंमळ बारीकच होते त्यामुळे सहविद्यार्थी त्यांची अनेकदा चेष्टा करत. एके दिवशी ही थट्टा असह्य होऊन त्यांनी चंग बांधला की यावर्षी परीक्षा वगैरे सर्व बाजूला ठेवून केवळ शरीरसंपदा कमवायची आणि अगदी हट्टाने त्यांनी हे ध्येय पूर्ण केले. बळवंतरावांचा हा हट्टी स्वभाव राजकारणातही अखेरपर्यंत टिकला. डेक्कन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना दाजीसाहेब खरे आणि गोपाळ गणेश आगरकर हे जिवाभावाचे सवंगडी लाभले. आगरकर आणि टिळक ही जोडी तर इतिहासात अजरामर आहे. या जोडीने गाजवलेला काळ गाडगीळांनी या कादंबरीत उत्तमरीत्या चितारला आहे. न्यू इंग्लिश स्कुल, केसरी-मराठा या प्रकल्पांची मुहूर्तमेढ, त्यात आलेल्या अडचणी, परस्परांचे झालेले वादविवाद या कादंबरीत छान रंगवल्या आहेत. लोकमान्यांच्या जीवनातील जवळजवळ सर्व प्रमुख अप्रमुख व्यक्ती, घटना या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळतात. लोकमान्यांवर अनेकदा ते छुपे सुधारक आहेत असा आरोप समकालीन लोकांकडून केला जाई, त्यावर लोकमान्य कायम युक्तिवाद करत की आपला सुधारणांना विरोध नसून त्या सुधारणा ब्रिटिशांनी आमच्यावर लादण्याला आहे, आमच्या धर्मात आणि रुढींमध्ये ब्रिटिशांना हस्तक्षेप करण्याचा काहीही अधिकार नाही !
केसरी-मराठा या वृत्तपत्राच्या सुरुवातीच्या काळात कोल्हापूर प्रकरणात केसरी आणि मराठाचे संपादक म्हणून टिळक आणि आगरकर यांना चार महिन्यांचा तुरुंगवास घडला. या संपादकद्वयींना तुरुंगात डांबल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला होता. अखेर डोंगरीच्या तुरुंगातून चार महिन्यांनी बाहेर पडल्यावर या दोघांचे जंगी स्वागत करण्याची तयारी जनसमुदायाने सुरू केली होती आणि याची संपूर्ण जबाबदारी उचलली होती खुद्द ज्योतिराव फुलेंनी. ठरल्याप्रमाणे टिळक आणि आगरकर चार महिन्यांनी तुरुंगातून सुटले आणि त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. लोकमत ही एक प्रचंड शक्ती आहे हे बळवंतरावांनी हेरलं. त्यांनतर या शक्तीचे बळवंतराव उपासक झाले आणि बळवंतराव टिळकांचे लोकमान्य टिळक झाले ! हिंदुस्थानात कुठेही टिळक येत असल्याची खबर मिळाली की जागोजागी लोक गर्दी करत मग ते रेल्वे स्टेशन असो की एखादी सभा. लोकमान्यांच्या राजकिय डावपेचांचे अनेक प्रसंग आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळतात. या कादंबरीच्या प्रस्तावनेत गाडगीळ म्हणतात, 'मुख्यतः बाळ गंगाधर टिळक हा माणूस होता तरी कसा, त्याचे व्यक्तिमत्त्व कसे घडत गेले, जीवनात तो काय मिळवण्यासाठी धडपडत होता, ती धडपड होती तरी कशी, हा भारतीय समाज व टिळक यांच्यात जे एक विलक्षण नाते निर्माण झाले होते ते होते तरी कसे याचे जिवंत चित्र निर्माण करणे व टिळकांच्या जीवनातले अनेकविध आकार घडताना दाखवणे हे या कादंबरीचे खरे कार्य आहे." मला वाटते या कार्यात गाडगीळ यशस्वी झाले आहेत.
टिळकांच्या राजकीय जीवनामुळे त्यांचे कौटुंबिक जीवन काहीसे अधांतरीच राहिले परंतु त्यांनी त्यांचे कौटुंबिक कर्तव्य कधीच अधुरे सोडले नाही. राजद्रोहाच्या आरोपाखाली मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई निवर्तल्या. त्यावेळी भावनांचा उठलेला कल्लोळ आणि त्याला घातलेला लगाम याचे यथार्थ वर्णन गाडगीळांनी दुर्दम्य कादंबरीत केले आहे. याच मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. तसेच गोपाळ गणेश आगरकर शेवटच्या घटका मोजत असताना टिळक सर्व कटुता विसरून त्यांना भेटायला जातात हा प्रसंग अतिशय ह्रदयद्रावक आहे. कितीही मतभेद असले तरी आपल्या या जिवलग मित्राच्या आठवणीने टिळक नेहमी सद्गदित होत असत.
महाविद्यालयीन शिक्षणापासून सुरू झालेला हा झंझावाती प्रवास लोकमान्य टिळकांच्या महानिर्वाणापर्यंत आपल्याला नेतो. या कादंबरीकरता लेखक गंगाधर गाडगीळांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. ही कादंबरी वाचल्यावर हा प्रश्न पडतो की आपण विसरलो का टिळकांना? त्यांचा त्याग, त्यांची राष्ट्रनिष्ठा, त्यांचे विचार आज आपल्यातून हरवत चालले आहेत का? इतक्या मोठ्या राष्ट्रभक्तावर अशी वेळ आपण का आणली? आपण हे सुधारू शकतो का ? हो नक्कीच सुधारु शकतो. ही कादंबरी आपण वाचली तर आपल्यालाही अनेक उपाय सापडतील याची खात्री आहे. गणेशोत्सव, शिवजयंती असे अनेक उपक्रम सुरू करून लोक एकत्र आले तर परिवर्तन घडू शकते हे टिळकांनी सिद्ध केले होते. आपण आज या उत्सवांचे काय केले आहे याचा पुनर्विचार आपण करायला हवा. एवढे केले तरी टिळक आपल्यातून कधी जाणार नाहीत. मला या कादंबरीने अपरिमित ऊर्जा दिली आणि कोणत्याही परिस्थितीत न डगमगता आपले कार्य सिद्धीस नेण्याची शक्ती दिली. आपणासही ही शक्ती मिळो, बहुत काय लिहिणे !

टिळक महाराज की जय 🙏

पुस्तक : दुर्दम्य
लेखक : गंगाधर गाडगीळ
प्रकाशन : पॉप्युलर प्रकाशन
पृष्ठे : ७७२ 

Comments

  1. वा! सुंदर लिहिलय. लिहित रहावे असेच.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सुरेख लेख. असेच लिहीत रहावे असे सुचवतो.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

Beyond Sci-Fi: Stories of Ingenuity, Isolation, and the Human Spirit by Andy Weir

The Visitor: A Suspense Story You Can’t Put Down